John 10

उत्तम मेंढपाळ

1मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो मेंढवाड्यांत दरवाजातून न जातां दुसरीकडून चढून जातो, तो चोर आणि लुटारू आहे 2जो दरवाजाने आत जातो तो मेंढपाळ आहे.

3त्याच्यासाठी द्वारपाल दरवाजा उघडतो आणि मेंढरे त्याची वाणी ऐकतात. तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो आणि त्यांना बाहेर नेतो; 4आणि आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर तो त्यांच्यापुढे चालतो आणि मेंढरे त्याच्यामागे चालतात; कारण ती त्याचा वाणी ओळखतात.

5ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील; कारण ती परक्यांची वाणी ओळखीत नाहीत. 6येशूने त्यांना हा दाखला सांगितला. तरी ज्या गोष्टी तो त्यांच्याबरोबर बोलला त्या काय आहेत हे त्यांना समजले नाही.

7म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो की, मी मेंढरांचे द्वार आहे. 8जे माझ्या पूर्वी आले ते सर्व चोर आणि लुटारू आहेत, त्याचे मेंढरांनी ऐकले नाही.

9मी द्वार आहे; माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याचे तारण होईल; तो आत येईल आणि बाहेर जाईल आणि त्यास खावयास मिळेल. 10चोर तर, तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे.

11मी उत्तम मेंढपाळ आहे; उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला जीव देतो. 12जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे आणि ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत, तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो; आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून धरतो त्यांची दाणादाण करतो. 13मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे आणि त्यास मेंढरांची काळजी नाही.

14
This verse is empty because in this translation its contents have been moved to form part of verse Jhn 10:15.
In this translation, this verse contains text which in some other translations appears in verses Jhn 10:14-Jhn 10:15.
15मी उत्तम मेंढपाळ आहे; आणि, जसा पिता मला ओळखतो आणि मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो आणि जे माझे आहेत ते मला ओळखतात; आणि मी मेंढरांसाठी आपला जीव देतो. 16या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत; तीही मला आणली पाहिजेत आणि ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल.

17मी आपला जीव परत घेण्याकरिता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. 18कोणी तो माझ्यापासून घेत नाही. तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे आणि मला तो परत घेण्याचा अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून मिळाली आहे.”

19म्हणून या शब्दांवरून यहूदी लोकात पुन्हा फूट पडली. 20त्यांच्यातील पुष्कळजण म्हणाले, “त्याला भूत लागले आहे आणि तो वेडा आहे. तुम्ही त्याचे का ऐकता?” 21दुसरे म्हणाले, “ही वचने भूत लागलेल्या मनुष्याची नाहीत. भूताला आंधळ्याचे डोळे उघडता येतात काय?”

22तेव्हा यरुशलेम शहरात पुनःस्थापनेचा सण असून हिवाळा होता. 23आणि येशू परमेश्वराच्या भवनात शलमोनाच्या देवडीत फिरत होता. 24म्हणून यहूदी लोक त्याच्याभोवती जमले आणि त्यास म्हणाले, “आपण कोठवर आमची मने संशयात ठेवणार? तुम्ही ख्रिस्त असाल तर आम्हास उघडपणे सांगा.”

25येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हास सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही. मी माझ्या पित्याच्या नावाने जी कामे करतो ती माझ्याविषयी साक्ष देतात. 26तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही.

27माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात. 28मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि कोणी त्यांना माझ्या हातातून हिसकावून घेणार नाही.

29पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. 30मी आणि पिता एक आहोत.”

31तेव्हा यहूदी लोकांनी त्यास दगडमार करायला पुन्हा दगड उचलले.

32येशू त्यांना म्हणाला, “मी माझ्या स्वर्गीय पित्याकडची पुष्कळ चांगली कामे तुम्हास दाखवली आहेत. त्या कामांतील कोणत्या कामाकरता तुम्ही मला दगडमार करता?” 33यहूदी लोकांनी त्यास उत्तर दिले, “आम्ही चांगल्या कामासाठी तुला दगडमार करीत नाही, पण दुर्भाषणासाठी करतो; कारण तू मनुष्य असून स्वतःला देव म्हणवतोस.”

34येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही देव आहा, असे मी म्हणालो हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही काय? 35ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हणले आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाही, 36तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले, त्या मला, मी देवाचा पुत्र आहे असे म्हटल्यावरून तुम्ही ‘दुर्भाषण करता’ असे तुम्ही मला म्हणता काय?

37मी जर माझ्या पित्याची कामे करीत नसेन तर माझ्यावर विश्वास ठेवू नका. 38पण जर मी ती करीतो तर माझ्यावर विश्वास न ठेवला तरी त्या कामांवर विश्वास ठेवा. अशासाठी की, माझ्यामध्ये पिता आहे आणि पित्यामध्ये मी आहे. हे तुम्ही ओळखून घ्यावे.” 39ते त्यास पुन्हा धरावयास पाहू लागले, परंतु तो त्यांच्या हाती न लागता निघून गेला.

40मग तो पुन्हा यार्देनेच्या पलीकडे जेथे योहान पहिल्याने बाप्तिस्मा करीत असे त्याठिकाणी जाऊन राहिला. 41तेव्हा पुष्कळ लोक आले; ते म्हणाले, “योहानाने काही चिन्ह केले नाही हे खरे आहे, तरी योहानाने याच्याविषयी जे काही सांगितले ते सर्व खरे आहे.” तेथे पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

42

Copyright information for MarULB